मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात थंडीच्या लाटांची संख्या वाढणार; मुंबई आणि ठाण्यात थंडी कमी जाणवण्याचा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज.
ला-निनामुळे महाराष्ट्रातील थंडीचे चित्र
प्रशांत महासागरामध्ये सध्या ला-निना (La Niña) स्थिती सक्रिय असून, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ही स्थिती जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ला-निनाच्या प्रभावामुळे यंदाच्या हिवाळ्यात राज्याच्या हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. याचसोबत, इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या ऋण (Negative) असला तरी, तो लवकरच तटस्थ स्थितीत येईल. या बदलांच्या एकत्रित परिणामामुळे, डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत दिसून येईल.
किमान तापमानाचा (पहाटेच्या थंडीचा) तीन महिन्यांचा अंदाज
या हिवाळी हंगामात राज्याच्या बहुतांश भागांत थंडी नेहमीपेक्षा जास्त जाणवणार आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा खाली राहील, ज्यामुळे कडाक्याची थंडी जाणवेल. याउलट, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये थंडी कमी राहील आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडी नेहमीप्रमाणे (सरासरीच्या आसपास) राहील, असा अंदाज आहे.
















