मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बर्फवृष्टी वाढणार; नागरिकांनी सतर्क राहावे.
सध्याची हवामानाची स्थिती
महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सक्रिय झाली आहे, जी प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर व पश्चिम मराठवाड्याच्या काही भागांत जाणवत आहे. हवामानातील या बदलांना उत्तर भारतात सक्रिय झालेला वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) आणि दक्षिणेकडील दिटवाळ चक्रीवादळाचा प्रभाव कारणीभूत ठरत आहे. भारतीय हवामान खात्याने थंडीची ही लाट दर्शवली असून, सायंकाळच्या सत्रात थंडीचा जोर वाढलेला दिसून येतो.
चक्रीवादळ आणि राज्यातील पावसाचा प्रभाव
दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिटवाळ चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, रायल सीमा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागांत जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. हे चक्रीवादळ आता संपुष्टात येत असले तरी, त्याचा किरकोळ परिणाम महाराष्ट्रावर, विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामानाच्या स्वरूपात दिसून आला होता. मात्र, महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता फार कमी असून, किनारपट्टीवरील भागापुरता मर्यादित पाऊस झाला. मुख्य पावसाचा जोर दक्षिणेकडील राज्यांमध्येच राहिला आहे.
















